Pune : शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची संख्या घटली

पुणे – ज्या वेळी शिष्यवृत्ती परीक्षा चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू होती, तेव्हा राज्यभरातून १५ लाख विद्यार्थी नोंदणी करत होते. मात्र, २०१६ पासून ही परीक्षा पाचवी व आठवीसाठी करण्यात आली. सध्या ही संख्या सुमारे १० लाखांपर्यंत खाली आली आहे.
परिणामी, दरवर्षी विद्यार्थ्यांची घटती संख्या लक्षात घेता पुन्हा चौथी- सातवीच्या परीक्षाच अधिक व्यापक आणि प्रभावी ठरतात, असा निष्कर्ष शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे चौथी, सातवीसाठी शिष्यवृत्ती घेण्याच प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. मात्र, तो अद्याप प्रलंबित आहे.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची रुची निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. २०१६ पूर्वी चौथी व सातवीसाठी परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर वर्ग बदल करण्यात आला. सध्या दरवर्षी सुमारे ३३ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ५ हजार, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना ७ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती मिळते.
नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू झाले असून, विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केला आहे. मात्र, अद्याप शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात कोणताही निर्णय न घेतल्यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याचबरोबर संच आणि लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याची गरजही निर्माण झाली असल्याने शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून केली जात आहे.
शिष्यवृत्तीचा निकाल आठ दिवसांत
९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पुरता निकाल २५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला होता. मात्र, अद्याप अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. निकालाबाबत राज्य परीक्षा परिषदेकडे विचारणा वाढली आहे. परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या आठ दिवसांत निकाल जाहीर केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.





