पुणे: ‘एनएसएस’चे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आबासाहेब गरवारे महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) विशेष श्रमसंस्कार शिबिर चाकण येथील कोयाळी या गावात उत्साहात राबविण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत आयोजित शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पंढरीनाथ बुचडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोयाळी गावाचे सरपंच गणेश कोळेकर, अनिल दिघे, ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी डॉ.अविनाश शेलार, डॉ.हरी पवार आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत ‘एनएसएस’चा महत्त्वपूर्ण वाटा असून समाजात “एनएसएस’च्या स्वयंसेवकांचे योगदान अपेक्षित आहे, असे डॉ.पंढरीनाथ बुचडे यांनी सांगितले. ‘एनएसएस’ची शिबिरे विद्यार्थ्यांची ग्रामीण जीवनाशी नाळ बांधून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असे गणेश कोळेकर यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता, मंदिरांची स्वच्छता, लिंगभाव संवेदनशीलता जाणीवजागृती, वृक्षारोपण, गावाचे सामजिक आर्थिक सर्वेक्षण असे विविध उपक्रम राबविले. शिबिराच्या समारोपप्रसंगी “मएसो’चे सहसचिव सुधीर गाडे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश शेलार यांनी शिबिरात पार केलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला. शिबिराच्या कालावधीत बाळासाहेब तात्याबा कोळेकर, गोरक्ष पोकळे, बाळासाहेब येधुजी कोळेकर, विकास भिवरे, वंदना दिघे, भानुदास कोळेकर यांनी भेटी दिल्या.





