Pune : रस्ते, पदपथ अडवणाऱ्या २२६ मूर्ती विक्रेत्यांना नोटीस

पुणे – अतिक्रमणे करून गणेश मूर्तींचे दुकान लावणाऱ्या २२६ जणांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या दुकानांमुळे रस्ते अडवले जात आहेत. शिवाय, पादचारी मार्ग अडवले जात आहेत, असे पालिकेने म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणपतीसाठी मूर्तीचे बुकिंग सध्या केले जात आहे. प्रामुख्याने पेठांसह उपनगरांमध्ये मूर्ती विक्रीचे स्टॉल जागोजागी उभे करण्यात आले आहेत. पण, त्यामुळे आता पादचारी मार्ग, रस्ते अडवले जात आहेत. शिवाय, वाहतूक कोंडी होते. विशेष म्हणजे, महापालिका प्रशासनाने या दुकानांसाठी जागा निश्चित केल्या आहेत. पण, त्यापेक्षा भलत्याच आणि सोयीच्या ठिकाणी या विक्रेत्यांनी मांडव उभारून व्यवसाय सुरू केला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २२६ जणांना नोटीस बजावत अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३४ नोटीस सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने दिल्या आहेत. तर येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एकाही मूर्ती विक्रेत्याला नोटीस बजावलेली नाही, अशी माहिती अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी दिली.
क्षेत्रीय कार्यालय आणि नोटीस बजावलेल्या स्टाॅल्सची संख्या
नगर रस्ता – ९, येरवडा कळस- २१, ढोले पाटील – ३, औंध बाणेर – २९, शिवाजीनगर घोले रस्ता – १२, कोथरूड बावधन- ८, धनकवडी सहकारनगर -२४, सिंहगड रस्ता- ३४, वारजे कर्वेनगर – ७, वानवडी रामटेकडी – १, कोंढवा येवलेवाडी – ०, कसबा विश्रामबाग -१८, भवानी पेठ -८, बिबवेवाडी – २५





