Pune : सरकार कोणाचेही असो, साहित्यिकांनी बोलले पाहिजे

पुणे : पूर्वी साहित्यिक राजकीय विषयांवर मत मांडायचे. हल्ली कोणी बोलत नाही. केवळ पुस्तके येऊन चालणार नाही. चांगले, वाईट काय हे सांगून समाजाला मार्गदर्शन केले पाहिजे. तुम्ही बोलला तरच लोक पुस्तके विकत घेतील, असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केले. सोशल मिडियावर जे येते ते खरे की खोटे हे समजत नाही, केवळ पुस्तकातून प्रबोधन होईल. इतिहास काय याचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार कोणाचेही असो, साहित्यिकांनी राजकीय विषयांवरही बोलले पाहिजे. मराठीचे अस्तित्व पुसले गेले तर संमेलनाला अर्थ नाही. मराठी भाषा आणि संस्कृती जपा तरच जग दखल घेईल, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी अभिनेते रितेश देशमुख यांना ठाकरे यांच्या हस्ते कला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे, विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अभिनेते सयाजी शिंदे, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संचालक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.
भाषेसाठी इतर राज्य एकत्र येतात. कावेरीच्या पाणीप्रश्नावर तमिळनाडूमध्ये चित्रपट कलाकार, साहित्यिक आणि राजकारणी असे सगळे एका व्यासपीठावर येतात. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत असते. सरकार त्यांच्या पद्धतीने काम करेल. आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. या नद्यांचा संगम झाला तर मराठी माणूस आणि भाषेला धक्का लावायची कोणाची हिंमत होणार नाही, असे ठाकरे म्हणाले. मराठीसाठी आम्ही सांगू ते करालच. पण, जे जे आम्ही करू, त्यालाही पाठिंबा द्याल, अशी अपेक्षा आहे. तेव्हा फक्त गुन्हे दाखल करू नका, अशी टिप्पणीही ठाकरे यांनी केली.
रितेश यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यांना पुरस्कार मिळतात, आमच्या वाटेला फक्त तिरस्कार येतो, अशी शाब्दिक कोटी करत, आपण आपल्या भाषेवर ठाम राहायला हवे. जग त्यानंतरच तुम्हाला दाद देते. आपल्याकडील मुले-मुली एकमेकांना भेटल्यावर हिंदीत कशासाठी बोलतात? राज्यगीत असलेले आपले एकमेव राज्य आहे. मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्याची गरज आहे. इतिहासातून बोध घेणार नसू, तर इतिहास न वाचलेला बरा, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. महापुरुषांना आपण जातीपातींमध्ये अडकवायला नको. ही व्यक्ती माझ्या जातीच्या महापुरुषावर का लिहिते आहे, हा प्रश्न कधीपासून पडायला लागला? जातीपाती सोडून महाराष्ट्राने एकत्र आले पाहिजे. महाराष्ट्र हा मराठी म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.
मराठी घरामध्ये जन्म घ्यायला भाग्य लागते. मराठीमुळेच आपली ओळख होते. मला स्वप्नसुद्धा मराठीतच पडतात. हिंदीमध्ये काम करू लागल्यानंतर ‘तू मराठीमध्ये कधी काम करणार?’, असे वडिलांनी विचारले होते. लई भारी या माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाची सुरुवात राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने झाली. मराठी माझ्या हृदयामध्ये आहे.
– रितेश देशमुख, प्रसिद्ध अभिनेते





