पुणे : रात्र शाळा ‘समस्यांच्या अंधारात’; अनेक प्रश्न प्रलंबित : समान वागणुकीची गरज

पुणे – राज्यातील रात्र शाळांमधील विद्यार्थी व कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न गेल्या वर्षांपासून प्रलंबित आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी राष्ट्रवादी शिक्षक सेलने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे आग्रह धरला आहे.
सन 2017-18 मध्ये रात्र शाळा 165 दर्शविण्यात आल्या असून, यात कार्यरत शिक्षक 778 तर कर्मचारी 628 आहेत. विद्यार्थ्यांची संख्या 24 हजार 80 एवढी होती. मुख्याध्यापक 57, शिक्षक 573 अशी एकूण 630 पदे कार्यरत असून मुख्याध्यापकांची 23 तर शिक्षकांची 125 अशी 148 पदे रिक्त आहेत. लिपिकांची 108, शिपायांची 300 अशी एकूण 408 पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे लिपिक, शिपायांची कामे मुख्याध्यापकांना करावी लागत आहेत.
दरम्यान, या शाळांच्या समस्यांची जंत्रीच राष्ट्रवादी शिक्षक सेलने सादर केली आहे. यात म्हटल्यानुसार, “प्रत्येक रात्र शाळेत मुख्याध्यापक पद निर्माण करावे, शिक्षकांचा कार्यभार निश्चिती करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना द्यावेत, शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने देण्यात यावी व आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळावेत, इयत्ता नववी त बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळावीत, विशेष गुणवत्ता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षण विभागातर्फे सन्मान करण्यात यावा, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेशित करणाऱ्या शाळांचा जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर विशेष सन्मान करण्यात यावा, महापालिकांनी इमारत भाडे पूर्णपणे माफ करुन रात्र शाळांना प्रोत्साहित करावे, रात्रशाळांचे वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे, सन 2005 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व त्यानंतर सेवेत आलेल्यांना प्रचलित पेन्शन योजना लागू करावी, वेतनेत्तर अनुदानात दुप्पटीने वाढ करावी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास तात्काळ परवानगी देण्यात यावी, रात्रशाळांना आदिवासी भागातील शाळांप्रमाणेच विशेष दर्जा द्यावा,’ आदी मागण्यांच्या निवेदनात समावेश करण्यात आलेला आहे. सेलचे अध्यक्ष अविनाश ताकवले, सरचिटणीस सुनील सुसरे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.





