Pune news : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पुण्यात तरुणाई रस्त्यावर
घोषणाबाजी, हातातील फलक आणि तिरंग्यांच्या साक्षीने चौकात आंदोलनाचे तीव्र वातावरण निर्माण झाले. नीट पेपर फुटीचाही निषेध करण्यात आला.

पुणे – ‘इन्कलाब जिंदाबाद… भारत माता की जय… वंदे मातरम्… शिक्षणमंत्री राजीनामा द्या… सेव्ह एज्युकेशन…’ अशा विविध घोषणांनी रविवारी (दि. १९) बालगंधर्व चौक परिसर दणाणून गेला. लडाखचे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुण्यातील तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली.
घोषणाबाजी, हातातील फलक आणि तिरंग्यांच्या साक्षीने चौकात आंदोलनाचे तीव्र वातावरण निर्माण झाले. नीट पेपर फुटीचाही निषेध करण्यात आला.
आम आदमी पक्षाच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलकांच्या हातात “स्टॅंड विथ सोनम वांगचुक, सेव “एज्युकेश, शिक्षणमंत्री राजीनामा द्या, अशा मागण्यांचे फलक झळकत होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या वेळी वांगचुक यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहिम राबविण्यात आली.
आंदोलनाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र त्यानंतरही आंदोलकांनी शांततापूर्ण पद्धतीने घोषणाबाजी करत आपला निषेध सुरू ठेवला.
भारताचा तिरंगा आणि निळे झेंडे हातात घेत नागरिकांनी चौक परिसरात आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप दिले. देशातील शिक्षण व्यवस्था, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बालगंधर्व चौकात झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी –
आंदोलना दरम्यान दिलेली वेळ संपल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलकांना जागा सोडण्याची सूचना केली. या वेळी आंदोलकांना हटविताना आंदोलक आणि पोलिसांची बाचाबाची झाली. वरिष्ठ पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाद संपले.





