Pune News | पुणेकरांसाठी चिंतेची बातमी ; पाटबंधारे विभागाने पाणी पुरवठ्यावर घातली मर्यादा

प्रभात वृत्तसेवा
पुणे : पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेसाठी २०२५-२६ वर्षासाठी १४.६१ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. पालिकेने वर्षासाठी शहराला किती पाणी लागेल याचे अंदाजपत्रक जुलै महिन्यात दिले होते. त्यात पालिकेने शहराची लोकसंख्या ८१ लाख ६४ हजार ८६८ अशी गृहीत धरली होती. त्यात समाविष्ट गावे व रोजंदारी करणाऱ्या नागरिकांचा विचार केला आहे. त्यानुसार २१.०३ टीएमसी पाण्याची मागणी केली होती.
गेल्या वर्षी पालिकेने २१.४८ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. त्यामुळे पालिकेस यंदाही जादा पाण्यासाठी तीनपट शुल्क पाटबंधारे विभागास मोजावे लागणार आहे.पाटबंधारे विभागाने पाणीकोटा मंजूर करताना पालिकेचा पाणी वापर जास्त असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच २०३१ पर्यंत पालिकेस १४.६१ टीएमसीच पाणी मिळणार असल्याचे सांगून वाढीव पाणी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी देण्यासाठी पालिकेस चांगलीच कसरत करावी लागेल.
पालिकेचा वार्षिक पाणीकोटा मंजूर करताना पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा पालिकेचा पाणी वापर जादा असल्याची नोंद केली आहे. त्यात पालिकेने २०२४-२५ मध्ये तब्बल २२ टीएमसी पाणी वापरल्याचे नमूद केले आहे. यात खडकवासला धरणातून १९.७५ टीएमसी, पवना धरणातून ०.३६ टीएमसी तर भामा-आसखेड धरणातून १.९० टीएमसी पाणी वापरल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रत्यक्षात खडकवासला धरणाची साठवण क्षमता २९.५० टीएमसी आहे. मागील वर्षात शेतीसाठी ३ आवर्तन दिली. त्यासाठी १५ टीएमसी पाणीही दिले. पावसाळ्यात एकीकडे मुठा नदीत मागच्या वर्षी तब्बल ३२ टीएमसी पाणी सोडले असताना या कालावधीत पालिकेस दिलेल्या साडेसात टीएमसी पाण्याचाही एकूण पाण्यात समावेश केला जातो. त्यामुळे खडकवासला धरणातून पालिका जादा पाणी घेत असल्याचे दिसते.
ऑक्टोबर महिन्यात कालवा समितीच्या बैठकीत जो पाणीसाठा आहे, त्यावर पालिकेचा पाणीकोटा निश्चित करायला हवा. पालिका जूनपर्यंत घेत असलेले पाणी नमूद केल्यास पालिकेचा खडकवासला धरणातील पाणी वापर अवघा १२ टीएमसीवर येईल. त्यामुळे पालिकेसही दिलासा मिळेल.पाण्याचे अंदाजपत्रक मंजूर करताना पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा खडकवासला येथील पालिकेचे पाणी उपसा केंद्र ( जॅकवेल) ताब्यात देण्याची मागणी केली आहे.
पालिका जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या आदेशाचे उल्लंघन करते. पालिकेने तत्काळ उपसा केंद्र ताब्यात देण्याची अट पाटबंधारे विभागाने घातली आहे. तसेच, ही यंत्रणा ताब्यात घेण्य़ासाठी पाटबंधारे अधिकारी पालिकेवर दबाव टाकत नसल्याने आपल्याच अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारवाईचा इशारा दिला आहे.
कोणत्या धरणातून किती मिळणार पाणी..
-खडकवासला धरणसाखळी प्रकल्प – ११.५० टीएमसी
-खडकवासला धरण – ०.१० टीएमसी
-पवना – ०.३४ टीएमसी
-भामा-आसखेड जलाशय – २.६७ टीएमसी





