Pune News : देशातील सर्वात स्वच्छ शहर बनवणार! आयुक्तांनी घेतला कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश

प्रभात वृत्तसेवा
पुणे : शहरात सध्या रात्री शहर स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे. रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने रात्रपाळीतील सुरक्षा यंत्रणा मजबूत केली जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ऑन फिल्ड काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिले.स्वच्छतेचा पुणे पॅटर्न ही विशेष मोहीम पालिका आयुक्तांच्या पुढाकाराने सुरू झाली असून त्याचा भाग म्हणून आयुक्तांनी परिमंडळ क्र. ५ मध्ये आढावा बैठक घेतली.
बैठकीत शहरातील स्वच्छतेची सद्यस्थिती, घनकचरा व्यवस्थापनातील अडचणी, ऑन फिल्ड कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपायांचा सखोल आढावा घेतला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ ५ चे उपायुक्त सुनिल बल्लाळ, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ निरीक्षक आणि मोकादम यावेळी उपस्थित होते.
जाणून घेतल्या अडचणी..
बैठकीत मुकादमांनी कामकाजातील अडचणींची माहिती आयुक्तांना दिली. काही नागरिकांकडून असहकार्य, कचरा नियमानुसार न देणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, तसेच झोपडपट्टी आणि अरुंद रस्त्यांमुळे कचरा संकलनातील अडचणींचा उल्लेख त्यांनी केला. याशिवाय कचरा वाहतूक वाहनांची संख्या अपुरी असणे, पर्यायी गाड्या वेळेत न मिळणे, मनुष्यबळाचा तुटवडा आणि वयस्कर स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे कामाचा वेग कमी होणे या समस्याही मांडल्या.
अतिक्रमण आणि हातगाडी विक्रेत्यांकडून अस्वच्छता वाढत असल्याचेही लक्षात आणून देण्यात आले. रात्रपाळीत काही ठिकाणी दमदाटी व असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागतो, अशी तक्रारीही कर्मचाऱ्यांनी केल्या. या समस्या गांभीर्याने घेत आयुक्तांनी तातडीचे निर्देश दिले. त्यांनी कचरा वाहतूक वाहनांची संख्या वाढविणे, पर्यायी वाहने उपलब्ध ठेवणे, सकाळी वेळेत वाहनांचे नियोजन करणे, तसेच क्षेत्रीय पातळीवर मानवबळ व साधनसामग्रीचा समन्वय वाढविण्याचे आदेश दिले.
“स्वच्छता कर्मचारी,मुकादम व अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक आणि एकत्रित काम करणे अत्यावश्यक आहे. अन्य शहरांशी तुलना न करता पुढील वर्षात पुणे देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून उभे करायचे आहे”
-नवल किशोर राम ( महापालिका आयुक्त)





