Pune News : समन्स बजावूनही पत्नी गैरहजर; पतीला घटस्फोट मंजूर

पुणे : सध्याच्या पुढारलेल्या आणि सुशिक्षित समाजातही महिलांवर सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाच्या घटना सातत्याने घडत असतात. मात्र, आता याउलट परिस्थितीही पाहायला मिळत आहे. पतीचा मानिसक छळ होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. पत्नीच्या छळाला कंटाळलेले पती कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेऊ लागले आहेत.
एका प्रकरणात समन्स बजावून गैरहजर राहणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायाधीश वि. के. ठाकूर यांनी पतीला एकतर्फी घटस्फोट मंजूर केला. विशेष म्हणजे नऊ महिन्यात हा दावा निकाली निघाला. या प्रकरणी पतीच्या बाजुने अॅड. शुभांगी जेठीथोर यांनी बाजू मांडली.
विजय आणि रेखा ( काल्पनिक नावे) यांचा १ मार्च २०१६ ला विवाह झाला. लग्नानंतर रेखा सासरी दोन महिने व्यवस्थित नांदत होती. मात्र, त्यानंतर तिने पतीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
सकाळी उशिरा उठणे, घरातील कामे व स्वयंपाक न करणे, मोठमोठ्याने ओरडून बोलणे, विनाकारण सासरच्यांना त्रास देणे असे प्रकार रेखा करु लागली. शिवाय विजयला वेगळे घर घेण्यासाठी व आई-वडिलांपासून विभक्त राहून संसार करण्याचा तगादा लावला.
त्यानुसार विजयने वेगळे घर घेतले. परंतु, तरीसुद्धा रेखाकडून मानसिक त्रास देणे सुरूच होते. या सततच्या त्रासातून विजयला मानसिक आजार सुरू झाला. नोकरी गमवावी लागली.
दरम्यानच्या काळात रेखा बाळंतपणासाठी माहेरी गेली. मात्र, ती पुन्हा सासरी आलीच नाही. तिला वारंवार बोलवून देखील ती सासरी न आल्याने अखेर विजयने अॅड. शुभांगी प. जेठीथोर यांच्यामार्फत दावा दाखल केला होता.




