Pune News : पाणी, रस्ते, ड्रेनेजची कामे आता वेगात ; क्षेत्रीय कार्यालयांना मिळाले हे नवीन अधिकार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – स्थानिक पातळीवर १२ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांची दुरुस्ती आणि ड्रेनेजच्या कामांसह तातडीची देखभाल दुरुस्ती व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकारात वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी असलेले सहायक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्तांचे अधिकार वाढवल्यामुळे त्यांना १ ते ५ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता, तसेच निविदा काढण्याचे अधिकार असणार आहेत.
परिमंडळ उपायुक्तांना ५ ते २५ लाखांपर्यंतच्या निविदा काढता येणार आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.महापालिकेचा प्रशासकीय कारभार आयुक्तांच्या अधिकारात चालत असला, तरी प्रशासकीय कामकाजाचे नियोजन, तसेच सोय करण्यासाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालये उभारण्यात आली आहेत.
शहरात १५ क्षेत्रीय कार्यालये असून, ती मिनी महापालिका म्हणून ओळखली जातात. नागरिकांची अनेक कामे याच ठिकाणी केली जातात, तर या क्षेत्रीय कार्यालयांवर नियंत्रणासाठी परिमंडळ करण्यात आले आहे. त्यांच्याकडे क्षेत्रीय कार्यालये विभागून देण्यात आली असून, त्याची जबाबदारी उपायुक्तांकडे सोपविण्यात आली आहे.
म्हणून वाढविले अधिकार..
यापूर्वी महापालिका सहायक आयुक्तांना तीन लाखांपर्यंत, तर परिमंडळ उपायुक्तांना १० लाखांपर्यंतच्या निविदांचे अधिकार होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महापालिका निवडणुका न झाल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा, ड्रेनेज व अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अशा वेळी या कामांसाठी खर्च करण्यास क्षेत्रीय कार्यालयांना अधिकार आणि निधी नसल्याने ही कामे रखडली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकार वाढवले आहेत. मात्र, या कामांसाठी त्यांना परिमंडळ उपायुक्तांची मान्यता घेणे बंधनकारक आहे.
हे वाढले अधिकार…
-५ लाखांपर्यंतच्या निविदा काढणे
-१२ मीटरपर्यंत रुंद रस्त्यांची भांडवली कामे
-१२ मीटरपेक्षा अधिक रुंद रस्त्यांची देखभाल दुरुस्ती
-६०० मिमी व्यासाच्या ड्रेनेज व पावसाळी वाहिन्यांची भांडवली कामे
-नालेसफाई, खोलीकरण, रुंदीकरण करणे
-दुभाजक व रस्त्यांवरील ग्रीन पॅसेजची देखभाल दुरुस्ती
-स्मशानभूमी, महापालिका इमारती, शाळा, स्वच्छतागृहे देखभाल दुरुस्ती
-विद्युत विभागांतर्गत २५ लाखांपर्यंतची देखभाल दुरुस्तीची कामे
-आकाशचिन्ह परवाने, होर्डिंग परवाना, नामफलक मान्यता
-पाळीव प्राणी परवाने, सलून परवाने, मंगल कार्यालय परवाना
-मिळकतकर नावात बदल, मालमत्ता हस्तांतरण, करवसुली नियंत्रण





