Pune News : इंद्रायणी नदीच्या पाण्यामुळे शेतीला फायदा, मात्र जलपर्णीमुळे दुर्गंधी आणि धोका वाढला
Updated On:

चिंबळी : यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खेड तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे आळंदी, केळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, मरकळ, सोळू आणि धानोरे परिसरातील औद्योगिक आणि शेतीक्षेत्रातील पाण्याची समस्या सुटण्याची शक्यता आहे. शेतीसाठी हे पाणी फायदेशीर ठरणार आहे.
मात्र, मोशी-चिंबळी हद्दीतील इंद्रायणी नदीवर महाराष्ट्र शासनाने बांधलेल्या बंधाऱ्यांजवळ गेल्या चार ते पाच महिन्यांपासून जलपर्णी मोठ्या प्रमाणात अडकली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचे सिमेंट खट्टे तुटल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष घालून दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.





