प्रभात वृत्तसेवा पुणे – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट-गणानुसार मतदान केंद्रनिहाय मतदार यादी सोमवारी (दि. २७) प्रसिद्ध होणार होती. मात्र, संगणक प्रणालीचे तांत्रिक कारण देत ही मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम लांबणीवर टाकला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नवीन वेळापत्रकानुसार ही अंतिम मतदार यादी दि.१२ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.जिल्हा परिषद आणि १३ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावर दि. १ ते १४ ऑक्टोबरदरम्यान संबंधित तहसील कार्यालयात सूचना आणि हरकती नोंदविण्याची संधी दिली. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी गट-गणनिहाय अंतिम मतदार याद्या प्रकाशित करणे अपेक्षित होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करणे पुढे ढकलले आहे. या याद्या १२ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असल्या तरीही मतदार, नागरिक आणि राजकीय पक्षांना ३ नोव्हेंबरपासून मतदार याद्या माहितीसाठी उपलब्ध होतील.मतदार यादीमधील चुकांसंदर्भात राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्षांसह मनसे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढणार आहे. यामुळे मतदार यादी प्रसिद्ध करणे लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे.