प्रभात वृत्तसेवा पुणे – ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेच्या तब्बल ३ हजार कोटींच्या ६० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन, तसेच भूमिपूजन येत्या सोमवारी (दि. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच पुढील आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने हा कार्यक्रम लगेचच सोमवारी होणार आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने भाजपकडूनही जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम होणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण आणि प्रभाग निहाय मतदार याद्या अंतिम करण्याचे काम जवळपास संपले आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या तयार असलेल्या, तसेच भूमिपूजनाची तयारी झालेल्या प्रकल्पाची माहिती शासनाने महापालिकेकडून मागवली होती. त्यानुसार १३ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार होता. मात्र, अधिवेशनादरम्यान उद्घाटन, तसेच भूमिपूजन घेता येत नाही. असा नियम असल्याने हा कार्यक्रम दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला असून, आता हा कार्यक्रम सोमवारी होणार आहे. मात्र, त्यासाठी मुख्यमंत्र्यासोबतच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहेत. गेल्या आठवड्यात सर्व कामांची एकूण किंमत १२५० कोटी रुपये आहे सांगितले जात होती. मात्र, अनेक लहान- मोठ्या कामांचा समावेश केल्याने उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा आकडा तीन हजार कोटींवर गेला आहे. या प्रकल्पांचे लोकार्पण – सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे ८४२ कोटी – समान पाणी योजना २० टाक्या आणि वितरण झोनचे लोकार्पण ४५० कोटी – इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर ५३ कोटी – जागतिक सायकल स्पर्धेचा मार्ग १४५ कोटी – सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प १३. ३१ कोटी – खराडी, चांदणी चौक आणि बाणेर येथील अग्निशामक केंद्राचे उद्घाटन २५ कोटी – वैद्यकीय महाविद्यालयाच्या ए व बी विंगचे लोकार्पण १३० कोटी – नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची इमारत २० कोटी रुपये या मुख्य प्रकल्पांचे भूमिपूजन बिंदू माधव चौकातील उड्डाण पूल आणि समतल विलगक आणि आचार्य आनंद ऋषिजी महाराज चौक (पुणे विद्यापीठ चौक) येथील उड्डाण पूल व समतल विलगक (१५० कोटी) शेवाळवाडी येथील पाणीपुरवठा प्रकल्प ३५ कोटी, मुंढवा केशवनगर टाक्या आणि जलवाहिनीच्या कामाची सुरुवात २७ कोटी, अमृत २ योजनेतून वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे २०० कोटी रुपयांचे काम होणार आहे. अशा एकूण ४१३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. यांसह आणखी सुमारे ९०० कोटीच्या कामांचा समावेश आहे.