Pune News | पुणे जिल्ह्यातील गावाचे होणार स्थलांतर ; अजित पवारांचा मोठा निर्णय

प्रभात वृत्तसेवा
पुणे – अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन व दरड कोसळून नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील साखरमाची (ता. आंबेगाव) या गावाचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करण्यासाठी महसूल व वनविभागाने जागेची आवश्यकता लक्षात घेऊन परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.या संदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या साखरमाची गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने प्रस्ताव तयार करावा. गावातील लोकांकडे उपलब्ध असलेल्या जागेची माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. पुनर्वसन करण्यासाठी जी जमीन उपलब्ध आहे, त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानग्या घेऊन तत्काळ कार्यवाही करावी. या गावामध्ये ४६ कुटूंब बाधीत होणार आहेत हे लक्षात घेऊन संपूर्ण कुटुंबांना पुनर्वसन करण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव महसूल आणि वनविभागाने संयुक्त परीक्षण करून तयार करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.




