Pune News – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांसह सर्व पक्ष सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग देणार असून, त्याच वेळी गटनेतेपदी कोणाची वर्णी लागणार, हे स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत 73 पैकी 51 गटांत विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर 13 पंचायत समित्यांपैकी 8 ठिकाणीही राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये गट स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतची नोंद जिल्हा प्रशासनाकडे केली जाणार आहे.पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली घेण्यात येणार आहे. गट स्थापना, गटनेता निवड, तसेच सभापती व अध्यक्षांची निवड ही निवडणुकीच्या निकालानंतर एक महिन्याच्या आत करावी लागते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांची भेट घेऊन त्यांची माहिती जाणून घेतली आहे. गट स्थापनेसाठी त्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. या वेळी काही जणांनी वैयक्तिक, तसेच काही तालुक्यांनी पदाची मागणी केली आहे. मंगळवारी पक्षाच्या गटाची स्थापना करून गटनेत्याची निवड केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली.