पुणे – पुणे- सोलापूररस्त्यावरील उरूळी कांचनमधील इनामदारवस्ती येथे शनिवारी (दि.१४) भरदिवसा एकाजणाने पिस्तूलातून दोघांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचे एकच खळबळ उडाली. रात्री उशीरा गोळीबार करणार्याला पुणे ग्रामिण पोलिसांनी ताब्यात घेतले. दशरथ शितोळे (इनामदार वस्ती, ता. हवेली) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. शितोळे याने केलेल्या गोळीबारात काळूराम महादेव गोते हे जखमी झाले आहेत. अर्थिक वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास शितोळे यांच्याकडे दोघेजण आले होते. पैशांच्या कारणातून त्यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यानच शितोळे यांनी त्यांच्या पिस्तूलातून दोघांवर गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच ऊरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू होता. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यासह पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. उरूळी कांचन पोलीस पुढील तपास करत आहेत.