पुणे – डांबर असलेल्या ड्रममधे अडकलेल्या दोन श्वानांची कोंढवा अग्निशमन दलाकडून सुटका करण्यात आली. पारगे नगर, डीएसके सोसायटीमागे डांबर असलेल्या ड्रममधे दोन श्वान अडकल्याची वर्दी मिळाल्यानंतर त्यांची सुटका करण्याकरिता कोंढवा अग्निशमन दलाचे वाहन रवाना झाले.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एका ड्रममधे मोठ्या प्रमाणात डांबर असून त्यामधे श्वानाची दोन पिल्ले अडकली असून त्यांना सुखरुप बाहेर काढण्याचे आव्हान जवांनापुढे होते. तसेच तेथील स्थानिकांनी उंच डोंगर भागावरुन टॅक्टरमधून हा ड्रम खाली आणला होता.
वाईल्ड एनिमल्स अँन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष आनंद अडसुळ यांना संपर्क साधत त्यांचे दोन सदस्य ही त्याठिकाणी पोहोचले होते. जवानांनी शक्कल लढवत प्रथम त्या सर्क्युलर सॉ हे अग्निशमन उपकरण वापरुन ड्रमचे दोन भाग केले. नंतर अग्निशमन वाहनातील विविध छोट्या बचाव साहित्यांचा उपयोग करुन तसेच तेलाचा वापर करुन सुमारे तासाभरात हळूहळू दोन्ही श्वानांची सुखरुप सुटका केली.
या कामगिरीत कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील तांडेल निलेश लोणकर, वाहनचालक दिपक कचरे तसेच जवान रवि बारटक्के, सागर इंगळे, अनिकेत गोगावले, मनोज गायकवाड, संतोष माने आणि लक्ष्मण वाघमारे, संदेश रसाळ यांनी सहभाग घेतला. दरम्यान, अग्निशमन दलाकडे वेळीच माहिती देत मदत केल्याने अग्निशमन दल व प्राणी संस्था यांना श्वानाची सुटका वेळेवर करता आली.