Pune news : जीवे ठार मारणे प्रयत्न प्रकरणातून बारा आरोपींची निर्दोष मुक्तता

पुणे – ऑक्टोबर 2018 मध्ये कोथरूड मध्ये दोन व्यक्तींना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी धीरज कुडले व त्याच्या इतर 11 साथीदाराविरुद्ध भा.द.वी. कलम ३०७ नुसार कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व आरोपीची सबळ पुराव्या अभावी जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी सर्व आरोपी तर्फे ॲड अजित पवार व प्रणित नामदे यांनी काम पाहिले. कोर्टात या केसच्या सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणी दोन्ही जखमींना फिर्यादी यांनी उपचारासाठी दवाखाण्यात दाखल केले होते.
दरम्यान कोथरूड येथे जखमी व्यक्तींवर तलवार, कोयता व इतर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. न्यायालयाने सदोष पुराव्या अभावी सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने ॲड अजित पवार, प्रणित नामदे, वेदांत म्हैसकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या प्रकरणात सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयात सादर केलेले पुरावे यावरून न्यायमूर्ती अ. ली. टिकले. यांनी निरीक्षणे नोंदवली.
यात आरोपी यांनी जखमी व्यक्तींना मारहाण केल्याचा सबळ पुरावा नाही. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांमध्ये आरोपी यांनी खुनाचा प्रयत्न केला अशा प्रकारचे ठोस पुरावे सरकारी पक्षाने सादर केलेले नाहीत.
यामुळे जिल्हा व सत्र न्यायालय यांनी आपल्या निकालात स्पष्ट केले की, आरोपी विरुद्ध लावलेले आरोप सिद्ध करणाऱ्या सबळ पुराव्यांच्या अभावामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.





