Pune News : घोरपड वन्यप्राण्याच्या गुप्तांगाची तस्करी; तीन जणांना अटक

Pune news : घोरपड वन्यप्राण्याच्या गुप्तांगाची (हात्ताजोडी) तस्करी प्रकरणी आज दिनांक 2 मार्च 2025 रोजी सोलापूर येथे तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. वन विभाग सोलापूर अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी (रोहयो) सोलापूर यांच्या कार्यालयाने ही कारवाई केलेली आहे.
आज मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोलापूर रेल्वे स्टेशन वर आरोपी घोरपडीचे गुप्तांग (हात्ताजोडी) विक्री करण्यास येणार असल्याची खात्रीदायक गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सकाळ पासून सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यात आलेली होती.
संशयित आरोपी एका चार चाकी गाडी मधून घोरपडीचे गुप्तांग (हात्ताजोडी) विक्रीसाठी घेऊन आले होते. रेल्वे स्टेशन वर आल्यावर ठरल्याप्रमाणे खबरी याने आरोपीना ओळखले व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांना पकडून ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्यांच्याकडे 151 घोरपडीचे गुप्तांग (हात्ताजोडी) सापडून आले आहेत.
आरोपी नामे विठ्ठल सुग्रीव पाटोळे, वय 29 वर्षे, सुग्रीव रंगनाव पाटोळे, वय 60 वर्षे व बाळासाहेव लक्ष्मण डोरले, वय 34 वर्षे यांचे वरती वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 2/2, 9, 39, 40, 48 अ,49 अ व ब,50, 51, 57 अंतर्गत वन गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
हे सर्व गुन्हेगार सराईत असून त्यांच्याकडून असे घोरपडीचे गुप्तांग (हात्ताजोडी) विक्री यापूर्वीही झाले असल्याचे समजते, घोरपड वन्यप्राणी हा वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत शेडूल 1 मध्ये येत असून अतिउच्च दर्जाचे त्याला संरक्षण देण्यात आलेले आहे. वरील गुन्हा करिता वरील कायद्यानुसार 3 ते 7 वर्षे सक्त मजुरी व रु.25000 पेक्षा जास्त दंडाची शिक्षा आहे.
सदरची कारवाई डॉ. क्लेमेंट बेन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, एन आर प्रवीण, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे, महादेव मोहिते, उपवनसंरक्षक सोलापूर, अजित शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली रोहितकुमार गांगर्डे, वनपरिक्षेत्र अधिकारी (रोहयो) सोलापूर व वनपाल रुकेश कांचळे, इरफान काझी, शशिकांत सावंत, वनरक्षक श्रीशैल पाटील, अश्विनी सोनके, योगेश जगताप, सायली ठोंबरे, रमेश कुंभार, सुरेश कुरले, रेणुका सोनटक्के, अनिता शिंदे, नितीन चराटे, वाहन चालक कृष्णा यांनी केली.




