Pune News | महिन्याभरात फोडणार वाहतूक कोंडी ; पोलिस आणि महापालिकेची संयुक्त मोहीम

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरातील वाहतूक कोंडीसाठी भाजी व फळ विक्रेते, अनधिकृत पार्किंगसह विविध कारणे जबाबदार असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आता अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्त कारवाई करून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. शहरातील ३२ प्रमुख रस्त्यांवरील २२ वाहतूक जंक्शन अतिक्रमणमुक्त केले जाणार आहेत. त्यात या जंक्शनमधे वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग, तसेच रिक्षा आणि पीएमपीचे प्रवासी थांबे हटविण्यात येणार आहेत.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला होता. त्यानुसार पथ विभागातील दोनशेहून अधिक कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली आणि संबंधित ठिकाणांची छायाचित्रे काढली. पाहणी अहवाल मंगळवारपर्यंत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार शहरातील ३२ रस्ते आणि वाहतूक कोंडी निर्माण होणारे २० हून अधिक चौकांचा सविस्तर अहवाल बुधवारी सादर करण्यात आले.
या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
“अभियंत्यांच्या पाहणीत वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे, अनधिकृत रिक्षा थांबे, झाडे, बेकायदेशीर पार्किंग, भाजीविक्रेते, डिपी बॉक्स, फिटर-पीलर, वाहतूक बेटे, सायकल ट्रॅक, पदपथांची अतिरिक्त रुंदी अशा अनेक कारणांची नोंद झाली आहे. त्याबाबत स्वतंत्र चर्चा करून उपाययोजना करण्यात येणार आहेत. यात तातडीची कामे आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश आहे.”
– अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख
अशा असतील उपाययोजना
– स्वतंत्र सायकल ट्रॅकऐवजी लाल रंग देऊन तो सायकलस्वारांसाठी ठेवणार
– पथारी व्यावसायिकांना पर्यायी जागा देणार
– अनधिकृत पार्किंगवर कारवाई होणार
– ३२ रस्त्यांच्यालगतच्या आरक्षित सार्वजनिक जागा पार्किंगसाठी देणार
– अनधिकृत रिक्षा थांबे जवळच स्थलांतरित केले जाणार
– वाहतूक बेटे व सुशोभीकरण फलक काढून टाकणार




