Pune News : डेंगळे पुलाखाली चेंबरवर अडकलेल्या २२ वर्षीय युवकाची थरारक सुटका; २० मिनिटांत यशस्वी बचावमोहीम
डेंगळे पुलाखाली पाण्याच्या मध्यभागी असलेल्या चेंबरवर अडकलेल्या २२ वर्षीय युवकाची पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसी बचावमोहीम राबवत सुखरूप सुटका केली.

Pune News : शहरातील डेंगळे पुलाखाली पाण्याच्या मध्यभागी असलेल्या चेंबरवर अडकलेल्या २२ वर्षीय युवकाची पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसी बचावमोहीम राबवत सुखरूप सुटका केली. पाण्याचा वाढता प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या १५ ते २० मिनिटांत ही मोहीम यशस्वी करण्यात आली.
आज दुपारी सुमारे २.२५ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला डेंगळे पुलाखाली एका युवक अडकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कसबा अग्निशमन केंद्रातील बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी युवकाला पाण्याच्या मध्यभागी असलेल्या चेंबरवर अडकलेल्या अवस्थेत पाहिले. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याचे लक्षात घेत जवानांनी कोणताही विलंब न करता दोरखंड, शिडी आणि लाईफ जॅकेटच्या साहाय्याने बचावकार्य सुरू केले. अत्यंत दक्षतेने युवकापर्यंत पोहोचून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
सुटका करण्यात आलेला युवक २२ वर्षांचा असून तो पुलाखाली कसा अडकला, याबाबत त्याच्याकडून स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या बचावकार्यात वाहनचालक समीर शेख तसेच जवान समित दळवी, गणेश लोणारे, राजेंद्र महाडीक, प्रसाद नाणेकर, संतोष अरगडे, प्रतीक कुंभार आणि आतिश नाईकनवरे यांनी मोलाची भूमिका बजावली.





