प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील चार प्रमुख विद्याशाखांमधील अधिष्ठाता पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांपासून ही महत्त्वपूर्ण पदे रिक्त होती. विद्यापीठ प्रशासनाने आता या चारही पदांसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली असून, येत्या गुरुवारपासून (दि. १३) अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.अनेक वर्षांपासून ही चारही पदे रिक्त असल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजाला एक प्रकारे खीळ बसली होती. आता नियुक्ती प्रक्रिया सुरू झाल्याने शैक्षणिक वर्तुळातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी १० जुलै २०२३ रोजीही अधिष्ठाता पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने अधिष्ठाता पदांसाठी आरक्षण निश्चितीची प्रक्रिया नव्याने केली जाणार असल्याचे स्पष्ट करत, ती भरती प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्यापीठाला ती प्रक्रिया थांबवावी लागली. आता राज्य सरकारकडून आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने विद्यापीठ प्रशासनाने ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. दरम्यान, विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार या पदांसाठी १३ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जातील. यासाठी दि. १२ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती आणि अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर १७ मे २०२२ रोजी निवृत्त झाले. तेव्हापासून आजतागायत ही अधिष्ठाता पदे रिक्तच होती. मधल्या काळात या पदांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपवला होता. मात्र, जवळपास तीन वर्षांपासून पूर्णवेळ अधिकारी नसल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीस गती मिळत नव्हती. शैक्षणिक कामकाजाला वेग देण्यासाठी पूर्णवेळ अधिष्ठाता असणे अत्यंत आवश्यक आहे. आचारसंहितेपूर्वी नियुक्तीचा प्रयत्न.. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ही महत्त्वाची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. आचारसंहितेपूर्वी प्रक्रिया सुरू झाल्याने, या नियुक्त्या वेळेत पूर्ण होतील आणि विद्यापीठाला लवकरच चारही विद्याशाखांसाठी पूर्णवेळ अधिष्ठाता मिळतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.