वाघोली : पिंपरी सांडस परिसरात ऊस तोड सुरु असताना बिबट्याचे तीन बछडे शेतात आढळून आले होते. मादी व बछड्यांची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाने बछडे सुरक्षित ठेवल्यानंतर मादी बिबट्या बछडे घेऊन गेली. त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे ही लावण्यात आले होते. पिंपरी सांडस परिसरातील येथील शेतात ऊस तोड सुरू असताना कामगारांना हे बछडे आढळून आले. त्यांनी मालकाला सांगितले. यानंतर वन विभागाला कळविण्यात आले. अवघ्या चार पाच दिवसांच्या असणाऱ्या या बछड्यांना वन विभागाने सुरक्षित टोपलीत ठेवले. नंतर त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले. मादी बिबट्याने रात्रीच्या वेळी तिन्ही बछड्यांना आपल्या बरोबर शेतात नेले. त्या कामगाराना मादी बिबट्याचे ही दर्शन झाले होते. वाघोली, मांजरी, पिंपरी सांडस, केसनंद, वाडेबोल्हाई आदी ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आला आहे. बिबट्याने मानवावर हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या नसल्या तरी जनावरांना शिकार बिबट्याकडून केली जात आहे. यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी. एकटे बाहेर पडू नये. मुलांना एकटे सोडू नये. उसाच्या शेतात जाताना काळजी घ्यावी. असे आवाहन वन विभागाने केले आहे.