Pune News : गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर खून प्रकरणात तीन जण अटकेत; मुख्य सुत्रधार फरार

पुणे – सिंहगड पायथ्यापासून अपहरण झालेल्या गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर पोळेकर यांचा खून झाल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी तीघा आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सुत्रधार फरार आहे. आरोपींनी कोयता आणि सत्तूरने पोळेकर यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन ते खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये टाकले होते. यातील काही अवशेष शनिवारी ग्रामीण पोलिसांच्या हाती लागले आहेत.
विठ्ठल सखाराम पोळेकर (७० रा. पोळेकर वाडी, सिंहगड पायथा, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या खून प्रकरणी रोहित किसन भामे (रा.डोणजे ता.हवेली), शुभम पोपट सोनवणे (२४,रा.संगमनेर) आणि मिलींद देविदास थोरात (२४, रा.बेलगाव, ता. कर्जत) यांना अटक करण्यात आली. तर मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे (रा.डोणजे) हा फरार आहे.
ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांनी माहिती दिली की, अपहरणाचा गुन्हा दाखल होताच वेगाने तपास सुरु केला. पोळेकर यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासताच त्यांच्या घरासमोरुण एक स्विफ्ट गाडी सिंहगड किल्लयाच्या दिशेने गेल्याचे आणि काही मिनिटांत पुन्हा माघारी पायगुडेवाडी मार्गे पानशेतकडे गेल्याचे आढळले.
ही गाडी गावातील योगेश भामे याची असल्याचे कळले. योगेश घरी नव्हता तसेच त्याचा फोनही बंद होता. यामुळे त्यानेच अपहरण केल्याची खात्री झाली. गाडीचा तांत्रीक माग काढता पोलीस नाशिकपर्यंत गेले. तेथून आरोपी रेल्वेने जबलपूर येथे गेल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी जबलपूर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी शुभम आणि मिलींदला ताब्यात घेतले.
दरम्यान ग्रामीण पोलिसांचे एक पथक जबलपुरला गेले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेताच चौकशी केली असता, त्यांनी पोळेकर यांचा खून करुन मृतदेहाचे तुकडे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये टाकल्याचे सांगितले. पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने घटनास्थळी जाऊन बोट आणि ड्रोनच्या सहाय्याने शोध घेऊन काही अवशेष हस्तगत केले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुनीलकुमार पुजारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी केली.





