Pune News: यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात ! गणेश मंडळांच्या परवानाबाबत पोलीस आयुक्त म्हणतात….

पुणे – निर्धारीत नियमांत गणेशमंडळांना परवाने देण्यासाठी पोलिस सकारात्मक आहेत. पाच वर्षासाठी एक परवाना ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मागील वर्षी ज्या गणेश मंडळांनी परवाने घेतले आहेत. त्यांनी या वर्षी नव्याने परवाना घेण्याची गरज नाही. तर नवीन मंडळांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयातील सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक सोमवारी (दि.12) आयोजित करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते.
यावेळी मानाच्या प्रमुख गणेशमंडळांसह शहरातील 300 मंडळाचे 600 प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, मनोज पाटील, शैलेश बलकवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
पोलिसांनी गणेशोत्वाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मंडळांच्या पदाधिकार्याची पहिली बैठक आयोजीत केली होती. बैठकीत पोलिस आयुक्तांनी मंडळांना असलेल्या अडचणीबाबत सुचना करण्याचे आवाहन केले.
त्यानुसार, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत सूचना मांडल्या. अमितेश कुमार म्हणाले, आम्ही स्वतः गणेश मंडळांच्या ठिकाला भेटी देणार आहोत. स्थानिक पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, त्याच बरोबर वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी मंडळाची पाहणी करतील. उभारण्यात येणार्या मंडपामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतील.
अनेक गणेश मंडळे हे वर्गणी न घेता उत्सव पार पाडतात. त्यासाठी मंडळ जाहिरातीच्या कामानी उभारण्याबरोबरच व्यवसायासाठी स्टॉल उभारतात. या स्टॉलला परवानगी देतांना वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी.
तसेच कमानी उभे करतांना सुद्धा वाहतुकीचा विचार करून नियमात बसले अशा पद्धतीने लावाव्यात. या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत.




