Pune News : पुणे स्टेशनवर लिफ्टची गती वाढतेय! आता २ आणि ३ नंबर प्लॅटफॉर्मवरही लवकरच सेवा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मागील चार महिन्यांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि सहावर प्रवाशांसाठी लिफ्ट सेवा सुरू झाली. आता महिन्याभरात प्लॅटफाॅर्म क्रमांक दोन आणि तीनवरील लिफ्ट सेवा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. या लिफ्टचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ही लिफ्ट सुरू झाल्यावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, लहान मुलांना त्याचा फायदा होणार आहे.पुणे विभागातील सर्वांत मोठे व व्यस्त स्थानक म्हणून पुणे रेल्वे स्टेशन ओळखले जाते. येथून दिवसाला साधारण १२० पेक्षा जास्त गाड्या धावतात, तर साधारण सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात.
मात्र, पुणे रेल्वे स्टेशनवर एकही लिफ्ट नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना बॅगा घेऊन प्लॅटफॉर्मवर जाण्यास खूपच अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन येथील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसविण्याची मागणी होत होती. पुणे रेल्वे विभागाने बोर्डाकडे प्रस्ताव पाठविल्यावर चार लिफ्ट बसविण्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार जून २०२५ मध्ये फ्लॅटफाॅर्म नंबर एक आणि सहावरील बाहेरच्या बाजूला असलेली लिफ्ट सेवा सुरू झाली. आता फ्लॅट फार्म नंबर दोन आणि तीनवरील लिफ्टचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही लिफ्ट सुरू होईल, असे पुणे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
“प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीनवरील लिफ्ट सेवा महिना अखेरपर्यंत सुरू होईल, तर प्लॅटफॉर्म नंबर चार आणि पाचवरील लिफ्टचे काम सुरू असून, हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे चौथी लिफ्ट सेवा नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सुरू होईल.”
– हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग





