Pune News : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याची रवानगी येरवडा कारागृहात

पुणे : प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास नकार दिला म्हणून सदाशिव पेठेत तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी (दि.1) सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
शंतनू लक्ष्मण जाधव (वय 21, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेमसंबंध संपविल्याच्या रागातून त्याने 27 जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. हल्ला झालेल्या 20 वर्षीय मुलीने याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाधववर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे





