Pune News | टीईटी सक्तीवर शिक्षकांचा सूर एकवटला ; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याची सक्ती करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला शिक्षण संस्था, शिक्षक संघटनांनी विरोध केला असून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याची बंधन घालताना निवृत्ती जवळ आलेल्या शिक्षकांनाही पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे.शिक्षक भारती संघटनेने सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र देऊन निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
पहिली ते आठवीच्या शिक्षकांनी दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण केली नाही तर सेवानिवृत्ती घ्यावी लागेल. पाच वर्षांपेक्षा कमी सेवाकाळ असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक केली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनांच्या झालेल्या बैठकीस शिक्षक भारतीचे संस्थापक, माजी आमदार कपिल पाटील यांनी पुनर्विचार पत्र देण्याचा प्रस्ताव ठेवला. बैठकीत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी राज्यव्यापी जागृती मोहीम राबवण्याचे आवाहन केले.





