Pune News : कर कोट्यवधींचा, सुविधांचे काय? शेवाळेवाडी ग्रामस्थांचा महापालिका आयुक्तांना थेट सवाल

मांजरी : शेवाळेवाडी आणि मांजरी बुद्रुक या नव्याने समाविष्ट गावांमधून पुणे महापालिका कोट्यवधी रुपये कररूपाने गोळा करते. मात्र या गावांना मूलभूत सुविधांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची खंत राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शेवाळे यांनी गावातील रखडलेल्या विकासकामांचा आणि समस्यांचा पाढा वाचला.
राहुल शेवाळे यांनी सांगितले की, शेवाळेवाडी आणि मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतींमधून महापालिकेने 80 कोटी रुपये कररूपाने वसूल केले, परंतु गावाच्या विकासासाठी केवळ पाच ते दहा लाख रुपये निधी मिळतो. “ग्रामपंचायत काळात यापेक्षा जास्त निधी मिळून विकासकामे होत होती,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी सरपंच प्रतिमा शेवाळे, माजी उपसरपंच राहुल शेवाळे, विजय कोद्रे, संजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे, बाळकृष्ण आप्पा शेवाळे आणि मंगेश शेवाळे उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्यासाठी 34 कोटी रुपये मंजूर झाले असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांनी आयुक्तांना तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कामाचे टेंडर त्वरित काढण्याची मागणी शेवाळे यांनी केली. तसेच, पुणे-सोलापूर महामार्गालगत ड्रेनेज वाहिन्या नसल्याने उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधत तातडीने ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणीही त्यांनी केली.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी शेवाळेवाडी आणि मांजरीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज वाहिन्या, स्ट्रीट लाईट, आरोग्य सुविधा आणि शास्तीकर माफी यासारख्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली. आयुक्त नवल किशोर राम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच, ते लवकरच या भागाला भेट देणार असल्याचे सांगितले.
शेवाळेवाडी आणि मांजरी ग्रामपंचायत हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज वाहिन्या, स्ट्रीट लाईट आणि आरोग्य सुविधांसह नव्या गावांचा शास्तीकर माफ करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून विकासकामांना गती द्यावी, असे त्यांनी सुचवले.





