Pune News – वाढत्या अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारे सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेता, पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने आता कंबर कसली आहे. येत्या आठ दिवसांत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज हटविले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पावसाळ्यापूर्वी संयुक्तपणे करायच्या कामांचा आज (बुधवार दि.११) पोलीस आयुक्त कार्यालयात आढावा घेण्यात आला. या बैठकीला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर अमितेश कुमार म्हणाले की, अनधिकृत होर्डिंग्जची समस्या सोडवण्यासाठी उद्यापासून (गुरूवार दि.१२) पोलीस आणि महापालिका प्रशासनाची संयुक्त मोहीम आखली आहे. आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले की, संपूर्ण शहरात केवळ ३ हजार अधिकृत होर्डिंग्ज असून त्यातून महापालिकेला ४२ कोटींचा महसूल मिळतो, अन्य सर्व अनधिकृत होर्डिंग असून ती हटविण्यात येणार आहेत. केवळ होर्डिंग्ज काढण्यावर न थांबता, प्रिंटिंग छापील जाहिराती लावणार्यांवरही कठोर कारवाई केली जाईल. बेवारस वाहनांसाठी डंपिंग यार्ड… पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याच्या तक्रारी असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील ४०० संवेदनशील पॉईंट्स निश्चित केले आहेत. त्यांचे अ आणि ब अशा दोन गटांत वर्गीकरण करण्यात आले असून, पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी आवश्यक ती सर्व कामे केली जात आहेत. याशिवाय रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांवर आता टोईंगच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे. यासाठी वॉर्ड स्तरावर स्वतंत्र डंपिंग यार्ड तयार केले जाणार आहेत. “शहरात रस्त्यांची संख्या कमी असून त्यामध्ये अनेक अडथळे आहेत. भविष्यात नवीन रस्ते, उड्डाणपूल उभारले जातीलच, पण सध्या असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये शहराला शिस्त लावणे गरजेचे आहे. महापालिका आणि पोलीस यांच्या समन्वयातून अनधिकृत होर्डिंग्ज, अतिक्रमणमुक्त पुणे मोहीम यशस्वी केली जाईल.” – नवलकिशोर राम, आयुक्त, महापालिका होर्डिंग्ज पुन्हा लावल्यास गुन्हा… अनधिकृत होर्डिंग्जवर एकदा कारवाई केल्यानंतरही संबंधित व्यक्तीने पुन्हा होर्डिंग लावले, तर त्या व्यक्तींवर थेट गुन्हा केला जाणार आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर वारंवार कारवाई करूनही अतिक्रमण पुन्हा डोके वर काढते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठप पोलीस, महापाकिकेडून व्यापक मोहीम राबवली जाणार आहे