Pune News | ध्वनिप्रदूषणाच्या कारवाईचा अहवाल सादर करा ; एनजीटीचे पुणे पोलिसांना आदेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मागील वर्षी पुणे पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या ध्वनिप्रदूषण नियमाच्या उल्लंघनाविरुद्ध काय उपाययोजना केली, याचा तपशीलवार अहवाल सादर करावा, असे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाच्या (एनजीटी) पश्चिम खंडपीठाने पुणे पोलिसांना दिले आहेत. १३ ऑगस्ट रोजी हे निर्देश दिले आहेत. पुण्यातील ऑडिओलॉजिस्ट डॉ. कल्याणी मांडके यांनी वकील मैत्रेय घोरपडे यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जावर हे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार आहे.
एनजीटीने ३० ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निकालात गणेशोत्सवादरम्यान ध्वनी पातळी कमी करण्यासाठी अनेक निर्देश जारी केले होते. एनजीटीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि पोलिसांना सर्व गणेश मंडळांवर रिअल-टाइम ध्वनी निरीक्षण करण्याचे आणि किमान दोन ठिकाणी परवानगी असलेल्या मर्यादेसह नोंदवलेले निरीक्षण ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच ढोल- ताशा गट ३० सदस्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आणि डीजे आणि टोल सिस्टिमवर बंदी घालण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या अर्जात असा आरोप केला आहे, की यापैकी अनेक निर्देशांची अंमलबजावणी पुणे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केली नाही. यामध्ये उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहितीही देण्यात आली नाही. १३ ऑगस्टला झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग (न्यायिक सदस्य) आणि डॉ. विजय कुलकर्णी (तज्ज्ञ सदस्य) यांच्या खंडपीठाने सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावल्या.
महाराष्ट्र राज्य आणि एमपीसीबीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी त्यांच्या अशिलांतर्फे नोटिसा स्वीकारल्या, तर न्यायाधिकरणाने उर्वरित प्रतिवादींना थेट रजिस्ट्रीद्वारे नोटिसा बजावण्याचा आदेश दिला.आमच्या तक्रारीच्या आधारे, एनजीटीने गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण देखरेखीसाठी पहिल्यांदाच २०० गणेश मंडळांवर रिअल-टाइम देखरेख केली. उत्सवानंतर सात दिवसांच्या आत ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांची यादी प्रकाशित करण्याचे निर्देश दिले होते; परंतु ते झाले नाही.
शिवाय वर्षभर कोणतेही जागरूकता कार्यक्रम आयोजित केले नाहीत. ध्वनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईबद्दल कोणतीही माहिती देण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत, अशी माहिती ऍड. घोरपडे यांनी दिली. गेल्या काही वर्षांत उत्सवादरम्यान ध्वनी मर्यादा मर्यादेपेक्षा खूप जास्त पातळीवर नोंदवली जाते. ध्वनी प्रदूषण केवळ गणेशोत्सवापुरते नाही, तर दहीहंडी, नवरात्र आणि इतर प्रसंगीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले.





