Pune News: वाघोली भावडी रस्त्याची मजबूत दुरुस्ती; खाण क्रशर संघटनेचा अभिनव उपक्रम

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली भावडी रस्त्याला ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना ये जा करण्यात अडथळे येत होते याबाबतीत पुणे जिल्हा खाण क्रशर संघटनेच्या वतीने सिमेंट काँक्रिटीकरण टाकून खड्डे बुजवले जात असल्याने नागरिकांकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकनेते स्वर्गीय बाबुराव पाचरणे यांनी वाघोली भावडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळपास आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या रस्त्याचे काम पूर्ण केले होते. वाघोली मधील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा विविध संघटनांचा या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा होता.
वाघोलीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच या भागातून ये जा करणाऱ्या जड वाहतूक मुळे रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले होते. या भागातील खाण क्रशर संघटनेच्या वतीने सिमेंट काँक्रीट टाकून खड्डे बुजवले जात असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
संघटनेच्या वतीने या रस्त्याची पाहणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, कमलबाग सोसायटीचे चेअरमन संतोष देशमुख, युवराज दळवी, पप्पू जाधव, प्रसाद सातव, संदीप जाधव, विकास गोरे, आदींनी केली आहे. संघटनेच्या वतीने चाललेल्या कामाबद्दल कमल बाग सोसायटी चे चेअरमन संतोष देशमुख यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.
वाघोली भावडी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना सिमेंट काँक्रीट करण्याच्या माध्यमातून खड्डे बुजवून संघटनेने मोलाची कामगिरी केली आहे. या रस्त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच त्या कामाचा पाठपुरावा करून रस्त्याला सुरुवात होणार आहे.
– रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, वाघोली





