Pune news : ‘छत्रपती शिवाजी महाराज व रामशास्त्री प्रभुणे यांचे पुतळे शिवाजीनगर न्यायालयात बसवावेत’; ॲड. बाळासाहेब खोपडे यांची मागणी

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श न्यायव्यवस्था निर्माण केली होती. आजची न्यायव्यवस्थाही बरीचशी महाराजांच्या न्यायव्यवस्थेवर अधारित आहे. तर चुकीला चुक म्हणणारे आणि पेशव्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या मराठी साम्राज्याचे प्रमुख न्यायाधीश (पंतन्यायाधीश) रामशास्त्री प्रभुणे या दोघांची जन्म व कर्मभूमी पुणे जिल्हा आहे.
त्यामुळे दोघांचा पुतळा शिवाजीनर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात बसवावा, अशी मागणी माजी अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता, पुणे आणि महाराष्ट्र राज्य सरकारी अभियोक्ता संघटनेचे माजी महा सचिव ॲड. बाळासाहेब खोपडे यांनी केली आहे. त्यांनी या मागणीचे निवेदन प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्याकडे दिले आहे.
शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. त्यामध्ये न्यायाधीश पदाचा अंतर्भाव केला होता. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन निपक्षपाती न्यायदानाची काम होत असे. गाव पातळीवरही आदर्श न्यायव्यवस्था होती. पाश्चिमात्य इतिहासकार म्हणतात की, महाराजांची शासनव्यवस्था ही न्याय व समानतेच्या न्यायदानावर अधारीत होती. न्यायदान कसे असावे, याचा आदर्श महाराजांनी निर्माण केला आहे. तो आदर्श आपल्या न्याययंत्रणेसमोर असावा, म्हणून न्यायालयात महाराजाचा पुतळा बसविणे आवश्यक आहे.
तसेच, ब्रिटीशांच्या नोंदीनुसार पेशव्यांना पुजाआर्चापेक्षा राज्यकारभारात लक्ष घालावे, असे ठासुन सांगणारे, खुद्द पेशव्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या रामशास्त्री प्रभुणे यांनीही न्यायव्यवस्थेत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे या दोघांचे पुतळे शिवाजीनगर न्यायालयात बसवावेत अथवा बसविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ॲड. बाळासाहेब खोपडे यांनी केली आहे.





