Pune News : कॉसमॉस बँकेमध्ये नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकेच्या विलीनीकरणास विशेष सर्वसाधारण सभेची मान्यता

पुणे – कॉसमॉस बँकेने दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये बेंगलुरू येथील नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँक लि. या सहकारी बँकेच्या विलीनीकरणास सभासदांनी बहुमताने मंजूरी दिली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी सांगितले. विद्यापीठ रस्त्यावरील बँकेच्या मुख्य कार्यालयात या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या भाषणात सीए काळे पुढे म्हणाले की, “नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकेच्या एकूण १३ शाखा असून, १२ शाखा बेंगलुरूमध्ये व १ शाखा म्हैसूर येथे आहे. तसेच नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकेचा व्यवसाय ऑगस्ट २०२४ अखेर रू.१,३९३ कोटी आहे. ” आत्तापर्यंत कॉसमॉस बँकेने १८ इतर लहान सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे. बेंगलुरू स्थित या बँकेच्या विलीनीकरणासाठी रिझर्व्ह बँकेने मान्यता दिल्यास, कॉसमॉस बँकेचा विस्तार कर्नाटक राज्यात मोठया प्रमाणात होणार आहे.
नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकेच्या दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये त्या बँकेच्या ३४५४ उपस्थित सभासदांपैकी ३२४९ सभासदांनी (९४.०६%) विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केले. विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केलेल्या सभासदांच्या शेअर्सचे एकूण मूल्याचे प्रमाण ९५.३६ % इतके आहे.
कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बँकेच्या दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित सभासदांपैकी ९७.४७% सभासदांनी विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केले आहे. विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केलेल्या सभासदांच्या शेअर्सचे एकूण मूल्याचे प्रमाण ९९.८२ % इतके आहे. बँकेतर्फे विलीनीकरणाचा प्रस्ताव लवकरच रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. सदर सभेस बँकेचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार संचालक मंडळातील सर्व सदस्य व व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे उपस्थित होते.





