पुणे : लोटस लँडमार्क आणि सत्यप्रभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कलादालन’ उपक्रमांतर्गत कोथरूड येथे ‘श्रावण क्वीन 2025’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा झाला. श्रावण महिन्याच्या पवित्र वातावरणात मंगळागौर, केशभूषा, वेशभूषा आणि काव्यवाचन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बिबवेवाडी येथील यशस्वी आयोजनानंतर कोथरूडमधील या कार्यक्रमानेही प्रेक्षकांची मने जिंकली. कोथरूड परिसरातील अनेक सोसायट्यांनी या सांस्कृतिक उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये योजनगंधा, सेवा, शीतल आणि अमन या सोसायट्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता. यापूर्वी बिबवेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात ‘लोटस मानस’ आणि ‘श्रीरंग सोसायटी’ यांनीही उल्लेखनीय योगदान दिले होते. स्पर्धकांनी आपल्या रंगीबेरंगी पोशाख, पारंपरिक गाणी, नृत्य आणि काव्यवाचनाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मनोरंजन केले आणि वातावरणाला मंत्रमुग्ध करणारा उत्साह निर्माण केला. या कार्यक्रमात ‘श्रावण क्वीन २०२५’ चा बहुमान अमन सोसायटीने पटकावला. विजेत्या सोसायटीसह सर्व स्पर्धकांनी दाखवलेल्या कलागुणांचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत लोटस लँडमार्क आणि सत्यप्रभा स्टुडिओच्या सहसंचालिका सौ. स्मिता सत्यप्रभा गिरी यांनी सांगितले, “कलादालनचा मुख्य उद्देश स्थानिक स्तरावर कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा आहे. कोथरूडमधील नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग आणि कलाकारांचा सन्मान यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. आम्ही यापुढेही अशा सांस्कृतिक उपक्रमांना चालना देत राहू.” या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी खालील मान्यवर उपस्थित होते: – ॲड. महुआ नारायण: हॉस्पिटॅलिटी लॉ एक्स्पर्ट आणि महिला सक्षमीकरण कार्यकर्त्या तसेच संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक. – शुभांगी सोमवंशी: रिफ्लेक्शन कॉस्मेटिक्सच्या मालक. – निशिगंधा कापरे: प्रख्यात नृत्यदिग्दर्शिका. या तिन्ही मान्यवरांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे बारकाईने मूल्यमापन करत विजेत्यांची निवड केली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आणखी रंगत आली. ‘कलादालन’ उपक्रमाच्या माध्यमातून पारंपरिक कला आणि संस्कृतीचे जतन करताना नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा लोटस लँडमार्क आणि सत्यप्रभा यांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. या कार्यक्रमाने कोथरूडमधील स्थानिक नागरिकांना एकत्र आणून सांस्कृतिक उत्सवाचा आनंद लुटण्याची संधी दिली. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा आयोजकांचा मानस आहे.