पुणे – वादातून रिक्षाचालक ज्येष्ठावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांना अटक केली. राजू दत्तू जगताप ( ६२, रा. जयप्रकाशनगर, किरकटवाडी, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. जगताप यांच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी प्रसाद भारत निकाळजे ( १८), समीर इंद्रजीत थापा ( २८), यश विनोद निकाळजे ( २३, तिघे रा. खुळेवाडी, चंदननगर, नगर रस्ता) यांना अटक करण्यात आली. याबाबत जगताप यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप आणि भारत निकाळजे हे नातेवाईक आहेत. आरोपी प्रसाद हा भारत निकाळजे यांचा मुलगा आहे. जगताप आणि निकाळजे यांच्यात कौटुंबिक वाद होता. १७ सप्टेंबर रोजी जगताप हे रात्री साडेदहाच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाने रिक्षातून निघाले हाेते. त्यावेळी आरोपी निकाळजे, थापा दुचाकीवरुन तेथे आले. आरोपी जगताप यांचा पाठलाग करत होते. आंबेगाव परिसरात आरोपींनी रिक्षाला दुचाकी आडवी घातली. जगताप यांना शिवीगाळ करुन त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात जगताप गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.