Pune News | बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा ; रोहित पवारांचा अजितदादांवर गंभीर आरोप, म्हणतात

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती गुंडाच्या हातात असून भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली आहे. समितीच्या संचालकांनी आणि अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरदहस्ताने तब्बल २०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) चे प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. अजितदादा यांना हा भ्रष्टाचार मान्य आहे का, याचा त्यांनी खुलासा करावा, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे उपस्थित होते. पवार म्हणाले, लवांडे हे गेल्या अनेक दिवसांपासून समितीतील भ्रष्टाचारावर सातत्याने आवाज उठवित आहेत. बेकायदा भाडे वसुलीचा जी-५५ गैरव्यवहार, ४ हजार लोकांना अनधिकृत परवाने, अनधिकृतपणे जागा भाड्याने देणे, रोजंदारी सेवकांच्या कायम नियुक्तीत भ्रष्टाचार, गाळ्यांचे अनधिकृत वाटप, संचालकांकडूनच पार्किंगच्या नावाखाली होणारी लूट, सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार, गुंडांचा सर्रास वापर आदी गैरव्यवहार सुरु आहेत.
विधी मंडळातही हा प्रश्न उपस्थित झाला असून १५ दिवसांत सरकारने कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही पवार यांनी दिला.चोरांकडूनच तपाससमितीतील गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी पणन संचालनकाने ५ सदस्यांची समिती नेमली आहे. जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असून त्यांचे अधिकारी, संचालकांशी लागेबांधे असल्याचा सर्वत्र आरोप होत आहेत. त्यामुळे चोरच चोरीचा तपास करणार का, असा प्रश्न पवार यांनी केला. समितीचे संचालक मंडळ मंत्र्याना पाकिट पोहोचवत असल्याने ते गप्प असल्याचा आरोपही पवार यांनी केला.





