Pune News | माथाडी कायदा बदलांविरोधातील सत्याग्रह आंदोलन तुर्तास स्थगित ; पण आंदोलनाचा इशारा कायम

प्रभात वृत्तसेवा
पुणे – माथाडी कामगार कायद्यात होऊ घातलेल्या बदलांविरोधात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने १६ सप्टेंबरपासून सुरू केलेले सत्याग्रह आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली सात दिवस आंदोलन करण्यात येणार होते. त्यामध्ये सहा जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.विधान परिषद आमदार योगेश टिळेकर व विधानसभा आमदार भिमराव तापकीर यांनी आंदोलन स्थळी डॉ. आढाव यांची भेट घेतली.
कामगार कायद्याचा मसुदा कामगार संघटनांना विश्वासात घेऊनच तयार करण्यात येईल. तसेच, खोट्या माथाडी आणि श्रमजीवी कामगारांना काढण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आले आहेत. खऱ्या माथाडी कामगारांच्या विरोधात काही बदल झाले असतील तर ते झालेले अनावश्यक बदल विचार विनिमय करून काढून टाकण्यात येईल, असे आश्वासन दोन्ही आमदारांनी दिले. टिळेकर यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी डॉ. आढाव यांच्याशी फोन वरून संभाषण करून दिले.
त्यावेळी पुढील आठवड्यात आपल्या कृती समितीची बैठक लावण्यात येईल तसेच मसुदा अंतिम करण्याअगोदर आपणास दाखवण्यात येईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. त्यानुसार शनिवारी (दि.२०) दुपारी आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. आढाव यांनी यावेळी दिला.





