Pune News : बालगंधर्व रंगमंदिरात 17 ते 19 जून दरम्यान रंगणार ‘रुपेरी चित्रगाथा चित्रपट महोत्सव’
मराठी चित्रपटसृष्टीचा समृद्ध वारसा, दर्जेदार कथानकं आणि आशयघन चित्रपट अधिकाधिक (Pune News) प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे १७, १८ आणि १९ जून २०२६ रोजी भव्य “रुपेरी चित्रगाथा मराठी चित्रपट महोत्सव २०२६” आयोजित करण्यात आला आहे.

Pune News : मराठी चित्रपटसृष्टीचा समृद्ध वारसा, दर्जेदार कथानकं आणि आशयघन चित्रपट अधिकाधिक (Pune News) प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे १७, १८ आणि १९ जून २०२६ रोजी भव्य “रुपेरी चित्रगाथा मराठी चित्रपट महोत्सव २०२६” आयोजित करण्यात आला आहे.
मराठी चित्रपट असोसिएशन, पुणे महानगरपालिका (Pune News) आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ (म.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या “सामना” या चित्रपटाने होणार आहे.
यावर्षी “सामना” या अजरामर चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार, मान्यवर आणि चित्रपटाशी संबंधित कलाकारांची विशेष उपस्थिती या महोत्सवात लाभणार आहे.
आजच्या काळात मल्टिप्लेक्समधील वाढत्या तिकीटदरांमुळे सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट पाहणे अनेकदा परवडत नाही. त्यामुळे अनेक उत्कृष्ट मराठी चित्रपटांपासून प्रेक्षक दूर राहतात. यावर पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन सुरू करण्याच्या अभिनव संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट (Pune News) दाखविण्याची ही संकल्पना महाराष्ट्रातील पहिलीच असून ती मराठी चित्रपट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची आहे. यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शनाचे प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आले असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
त्याच संकल्पनेला व्यापक स्वरूप देत राज्यस्तरीय मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नाट्यगृहांचा प्रभावी वापर करून मराठी चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत कमी खर्चात पोहोचविता येऊ शकतात, असा आयोजकांचा विश्वास आहे. नाट्यगृहांमध्ये परवडणाऱ्या दरात दर्जेदार मराठी चित्रपट उपलब्ध झाल्यास मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी मिळू शकते, ही या उपक्रमामागील प्रमुख भूमिका आहे.
महोत्सवातील चित्रपटांचे वेळापत्रक
बुधवार दि. १७ जून २०२६ (दिवस १)
चित्रपट – सामना
वेळ – सकाळी ९.३० वा.
गांधी टॉक्स (मूकपट)
वेळ – दुपारी १२.३० वा.
गुलकंद
वेळ – दुपारी ३.३० वा.
श्यामची आई
वेळ – सायं. ६.४५ वा.
माफीचा साक्षीदार
वेळ – रात्री ९.४५ वा.
गुरुवार दि. १८ जून २०२६ (दिवस २)
अशी ही बनवा बनवी
वेळ – सकाळी ९.३० वा.
कायद्याचं बोला
वेळ – दुपारी १२.३० वा.
क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम
वेळ – दुपारी ३.३० वा.
आशा
वेळ – सायं. ६.४५ वा.
देऊळ
वेळ – रात्री ९.४५ वा.
शुक्रवार दि. १९ जून २०२६ (दिवस ३)
पिंजरा
वेळ – सकाळी ९.३० वा.
श्वास
वेळ – दुपारी १२.३० वा.
आरपार
वेळ – दुपारी ३.३० वा.
एप्रिल मे ९९
वेळ – सायं. ६.४५ वा.
बाप्या
वेळ – रात्री ९.४५ वा.
या महोत्सवामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील विविध प्रवाहांचे दर्शन घडावे यासाठी जुने-नवे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, सुवर्णकमळ विजेते, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, विनोदी तसेच आशयप्रधान चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.या चित्रपटांमधून मराठी संस्कृती, सामाजिक वास्तव, ग्रामीण जीवन, कौटुंबिक मूल्ये, विनोद, संघर्ष, प्रेरणा आणि मानवी संवेदनांचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहेत. विशेष म्हणजे महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटातील कलाकारांची उपस्थितीही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
या महोत्सवाचा उद्देश केवळ चित्रपटांचे प्रदर्शन करणे नसून नाट्यगृहे हे मराठी चित्रपटांसाठी प्रभावी पर्यायी प्रदर्शन माध्यम ठरू शकते का, याची चाचपणी करणे हा आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार मराठी चित्रपट उपलब्ध करून दिल्यास ते मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी पुढे येतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.
चित्रपट पाहण्याचे स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
रसिक प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य | काही जागा राखीव
यावर्षीचा “रुपेरी चित्रगाथा मराठी चित्रपट महोत्सव २०२६” हा मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण परंपरेचा उत्सव ठरणार असून भविष्यात महाराष्ट्रभर अशा उपक्रमांना दिशा देणारा ठरेल. अशी माहिती महोत्सवाचे मुख्य आयोजक आणि मराठी चित्रपट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.






