प्रभात वृत्तसेवा पुणे – पसंत नसणे तसेच हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून नववधूस दीड महिन्यात म्हणजे ४५ दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांनी सुनेस एकरकमी ४५ लाख पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शविली. पत्नीनेही सासरविरोधातील कौटुंबिक हिंसाचारानुसार दाखल केलेला गुन्हे मागे घेतले. त्यानंतर, दाम्पत्यांनी परस्पर संमतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. कौटुंबिक हिंसाचारासह घटस्फोटाचा दावा अवघ्या वर्षात निकाली निघाला. माधव आणि माधवी (दोघांची नावे बदलेली आहेत) यांचा विवाह २९ जानेवारी २०२२ रोजी झाला. लग्नानंतर काही दिवसांत हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून सासू, सासरा व नणंदेकडून विवाहितेचा छळ सुरू झाला. यादरम्यान, माधव यानेही तू मला पसंत नव्हतीस, मला लग्न करायचे नव्हते, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून मी लग्न केले असे बोलून तिचा मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर आरोपींनी विवाहितेस घराबाहेर काढले. ती परत नांदण्यास आली असता तिला घरात घेतले नाही. माधव यानेही फोन घेणे व भेट घेण्याचे टाळले. दरम्यान, सासऱ्यांनी संपर्क साधत मुलाला दुसरे लग्न करायचे आहे, तुला नांदवायचे नाही, तू घटस्फोट दे, म्हणून मानसिक त्रास दिला. याप्रकरणी, तिने भोसरी पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासानंतर, आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात, पत्नीतर्फे ॲड. प्रियंका काटकर आणि ॲड. रेश्मा सोनार यांनी काम पाहिले. समुपदेशादरम्यान पतीने एकरकमी ४५ लाख देण्याची तयारी दर्शविली. त्यास पत्नीनेही होकार दर्शवित गुन्हा मागे घेण्याची तयारी दर्शविली. यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. तो न्यायालयाने मंजूर केला.