Pune News : एकाच आठवड्यात तीन वेळा नदीत राडारोडा! पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, जबाबदार कोण?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेला असलेल्या सलग सुट्ट्यांचा गैरफायदा घेत शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नदीपात्रात राडारोडा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी भिडे पुलाच्या परिसरात राडारोडा टाकण्यात आला होता आता ओकांरेश्वर मंदीराच्या मागील बाजूस धोबीघाट समोर तीन ते चार ट्रक राडारोडा टाकण्यात आला आहे. दिवाळी तसेच पाच दिवसांच्या आठवड्यामुळे महापालिकेस सलग नऊ दिवसांची सुट्टी आहे. त्यामुळे, राडारोडा टाकल्यास कारवाई होणार नाही तसेच लक्षातही येणार नाही याची दक्षता घेत मोठ्या प्रमाणात हा राडारोडा टाकला जात आहे.
शहरात निर्माण होणारा राडारोडा परस्पर विल्हेवाट न लावता त्यावर प्रक्रीया करण्य़ासाठीमहापालिकेकडून वाघोली येथे प्रक्रीया प्रकल्प उभारलेला आहे. त्यानुसार, बांधकाम व्यावसायिकांना असा राडारोडा महापालिकेच्या प्रकल्पावर देणे बंधनकारक आहे. तसेच, हा राडारोडा महापालिकेस न देता सार्वजनिक ठिकाणी, नदी, नाले, टेकड्या तसेच रस्त्यांकडेला टाकल्यास पालिकेकडून दंड आकारला जातो. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर दक्षता पथके नेमण्यात आली आहेत.
मात्र, त्यानंतरही असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे, भराव पडत असून नदीपात्र अरूंद झाल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात तीन वेळा राडारोडा वेगेवेगळ्या भागात टाकण्याचे प्रकार घडलेले असतानाही महापालिकेकडून हा राडारोडा उचलला जात आहे. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.





