pune news: भरधाव डंपरच्या धडकेत सेवानिवृत्त कृषी अधिकार्याचा जागीच मृत्यू

पुणे – भरधाव वेगातील डंपरने दिलेल्या धडकेत एका सेवानिवृत्त कृषी अधिकार्याचा जागीच मृत्यू झाला. सुनील भास्कराव देशमुख (वय-60, रा. निको गार्डन, विमाननगर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. देशमुख हे कामानिमित्त नळ स्टॉप परिसरातून जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.
याप्रकरणी, डेक्कन पोलिसांनी डंपरवरील चालक सुनिल बाबू होले (वय.35,रा. आळी क्रमांक 16, गोखलेनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.19) सकाळी पावने बारा वाजताच्या सुमारास नळ स्टॉप येथील रसशाळा चौक परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल देशमुख हे कृषी खात्यातून सेवानिवृत्त झाले होते. सोमवारी ते कामानिमित्त नळस्टॉप डेक्कन परिसरात आले होते. देशमुख डेक्कनकडून रसशाळा चौकातून मोपेड दुचाकीवरून जात होते. तर आरोपी चालक होले हा डंपर गॅरज कामासाठी घेऊन निघाला होता. होले याने डंपरने देशमुख यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
धडक बसताच देशमुख जोरात समोर खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले हे त्या परिसरात होते. त्यांना एका व्यक्तीने अपघात झाल्याची माहिती दिली. भोसले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत. त्यावेळी देशमुख हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.
भोसले यांनी नागरिकांच्या मदतीने देशमुख यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. भोसले यांनी डंपर चालक आरोपी होले याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.





