पुणे | घड्याळ चिन्ह काढून टाका

पुणे,{अंजली खमितकर} – घड्याळ म्हटले की राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेस म्हटले की शरद पवार हे समीकरण महाराष्ट्रात होते. परंतु, आता ही ओळख राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला पुसावी लागणार आहे. नव्या चिन्हांसह त्यांना नव्याने ओळख निर्माण करावी लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह आहे ते काढून टाका, असे आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहेत. शहर कार्यालयावरील पक्षाचे चिन्ह असलेले घड्याळ त्यांनी बुधवारीच काढून टाकले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांना दिले आहे. शरद पवार यांना त्यांच्या पक्षासाठी दुसरे नाव आणि पक्षचिन्ह वापरावे लागणार आहे.सध्यातरी राज्यसभा निवडणूक असल्याने तात्पुरत्या स्वरूपात त्यांना चिन्ह मिळणार आहे. परंतु, नव्या चिन्हाची ओळख मतदारांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाचे मंगळवारी चिन्हासंदर्भात निकाल दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण झाली, त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांची मते आजमावण्यासाठी, त्यांना समजून सांगण्यासाठी तसेच त्यांच्यामनातील संभ्रम दूर करण्यासाठी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जगताप यांनी बुधवारी समर्थक कार्यकर्त्यांची तातडीची बैठक शहर कार्यालयात बोलावली. तेथे कार्यकर्त्यांना वस्तुस्थितीची माहिती देण्यात आली तसेच नव्याने लढण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले.
दरम्यान, पक्षासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आणि जगताप यांनी सर्व समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना घड्याळाचे चिन्ह तत्काळ काढून टाकण्याचे अधिकृतपणे आदेशच दिले. हे आदेश बुधवारी दिले असले, तरी वर्षानुवर्षाची सवय आणि पक्षाच्या चिन्हामुळे आपली असलेली ओळख एवढ्या लवकर मनातून पुसून टाकली जाणार नाही. त्यामुळे चिन्ह काढण्याला अजूनही हात धजावत नाहीत. मात्र, पक्षाचा आदेश असल्यामुळे घड्याळ काढून नवे चिन्ह स्विकारण्याची मानसीकता ठेवावी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
पक्षाचे चिन्ह गेल्यानंतर बुधवारी घेतलेल्या पहिल्या बैठकीत चिन्ह काढून टाकण्याचे थेट आदेशच दिले. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अकाऊंट, व्हॉट्स अॅप डीपी, स्टेटस यासह सोशल मीडियावर कोठेही ठेवलेले घड्याळाचे चिन्ह आणि नुसते राष्ट्रवादी कॉंग्रेस हे नाव काढून टाकावे, याव्यतिरिक्त वाहने, घरावर, संपर्क कार्यालयावरील चिन्ह, नाव काढण्याबाबतही सांगण्यात आले. आता, पक्षाला मिळालेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावच लावण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे. – प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार





