पावसाचा रेड अलर्ट; पुण्यासह ५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Rain Update | राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.
पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावरून आणि उत्तर आंध्र प्रदेश व दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर काल ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाले आहे.
आजही मुसळधार पाऊस
तसेच समुद्रसपाटीवर दक्षिण कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर एक वाऱ्याची द्रोणीय रेषा जात आहे. त्यामुळे दि. १९ आणि २० ऑगस्ट रोजी कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.
दि. १९ ऑगस्ट रोजी ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, सातारा घाट विभागासह पालघर आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार, तर सिंधुदुर्ग अणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल.
जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती यासह कोल्हापूर घाट विभाग आणि गडचिरोली जिल्ह्यांत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवित हवामानशास्त्र विभागाने या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस विदर्भात मेघर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसामुळे सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.





