Pune News | जिल्ह्यातील घाट विभागाला रेड अलर्ट ; पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुढील २४ तासात पुणे जिल्ह्यातील घाट विभागात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवित हवामानशास्त्र विभागाने पुण्याला रेड अलर्ट दिला आहे.
शनिवारी (दि. १६) राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाट विभागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे घाट परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. ओढ्या-नाल्यांना पुरस्थिती निर्माण झाली. दरम्यान, दि. १७ आॅगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील घाट विभागात अति मुसळधार तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभागात तसेच सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल. त्यामुळे या जिल्ह्यांना आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, भंडारा, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, वाशिक, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.





