Pune News | रश्मी शुक्ला यांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा ; पोलीस यंत्रणा सतर्क

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून विसर्जन सोहळा बंदोबस्ताचा आढावा शुक्रवारी घेण्यात आला. पाषाण येथील बिनतारी संदेश विभागाच्या सभागृहात ही बैठक झाली.पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, पंकज देशमुख, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे, निखिल पिंगळे आदी उपस्थित होते.
वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन सोहळ्यासाठी पुणे शहरात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. प्रथेप्रमाणे विसर्जन मिरवणूक सोहळ्याचा प्रारंभ शनिवारी (६ सप्टेंबर) मंडईतील टिळक पुतळा परिसरातून होणार आहे. यावर्षी विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ एक तास म्हणजेच सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी मानाच्या मंडळांसाठी वेळापत्रक तयार केले आहे. वेळापत्रकानुसार मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून वेळेत विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विसर्जन मार्गावर ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. मिरवणूक सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे प्रमुख चौकात उभे केले जाणार आहेत. गर्दीतील चोरी, छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह विविध विसर्जन मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.





