Pune News : QR कोडचा बहाणा, अश्लीलतेचा विळखा; ऑनलाईन पेमेंटनंतर तरुणीचा केला सायबर छळ

पुणे – गुगल पे आणि फोन पे नागरिकांच्या चांगलेच अंगवळणी पडले आहे. अगदी दहा वीस रुपयांचे पेमेंट करायचे असले तरी आपण गुगल पे करतो. मात्र पेमेंट करताना आपण विचार करत नाही की आपला फोन नंबर समोरच्या व्यक्तीकडे जात आहे. तो त्याचा गैरवापरही करु शकतो.
असाच एक धक्कादायक अनुभव रिक्षा चालकाला गुगल पेव्दारे पेमेंट करणाऱ्या तरुणीला आला आहे. रिक्षा चालकाने तीच्या मोबाईल नंबरवर अश्लिल व्हिडिओ आणि मेसेज पाठवून विनयभंग केला. याप्रकरणी रिक्षा चालकाविरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एका २६ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनूसार अज्ञात रिक्षा चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत तरुणीने वाघोली ते विमाननगर असा रिक्षा प्रवास केला होता. तेव्हा तीने रिक्षाचे २० रुपये भाडे गगुल पे व्दारे दिले होते.
यामुळे तीचा मोबाईल नंबर हा रिक्षा चालकाकडे गेला होता. त्यानंतर रिक्षा चालकाने तीच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ आणि मेसेज पाठवले , यानंतर व्हिडिओ कॉल करुन अश्लिल बोलण्याचा प्रयत्न केला.
तसेच त्याचा अश्लिल फोटोही पिडितेला पाठवला. तीने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यावर त्याने दुसऱ्या मोबाईलवरुन पुन्हा असे प्रकार सुरु केले. अखेर तीने हडपसर पोलीस ठण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदाळे करत आहेत.





