Pune News | पुणेकरांची खरेदीला झुंबड! ; बाजारपेठा गजबजल्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने शनिवारच्या (दि.२३) सुट्टीचा योग साधत पुणेकर मोठ्या संख्येने साहित्य खरेदीसाठी बाहेर पडले होते. बोहरी आळी, रविवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसर आणि तुळशीबाग येथे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. विविध उपनगरातही नागरिक मोठ्या संख्येने खरेदी करताना दिसून आले. उद्या , रविवार (दि.२४) सुट्टी असल्याने खरेदीसाठी गर्दी होणार आहे.
बुधवारी (दि.२७) शहरात घरोघरी गणरायांचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आलेल्या सुट्टीच्या दिवशी पुणेकरांनी खरेदीचे नियोजन केले होते. त्यामुळेसकाळपासूनच मध्यवर्ती भागातील विविध रस्त्यांवर नागरिकांची गर्दी झाली होती.
दुपानंतर गर्दी वाढत गेली. संध्याकाळी गर्दी खुप वाढली होती. बाजारात पायी चालणेही अवघड झाले होते. त्यामुळे मध्यवर्ती भागात काही ठिकाणी वाहतुक कोंडीही झाली होती. मात्र, बाजारपेठातील दुकानदारांनी वाहने लांब लावून खरेदीस येण्याचे आवाहन यापूर्वी केले होते. त्यामुळे अनेकांनी वाहने लांब पार्क करून बाजारात खरेदीस करण्यासही पसंती दिली. खरेदीनंतर वाहनापर्यंत जाण्यास त्यांना कसरत करावी लागली.
लाईटींग माळा, देवाला घालण्यासाठी विविध माळा, सजावटीचे पडदे, विविध प्रकारच्या कमानी, फेटा, पुजेचे साहित्य खरेदी करण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती. उपनगरातही हीच अवस्था होती. स्थानिक बाजारपेठांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणत खरेदी करताना दिसून आले.





