Pune News | खरेदीसाठी पुणेकरांची झुंबड ; बाजारपेठा फुलल्या, रस्त्यांवर वाहतूक ठप्प

प्रभात वृत्तसेवा
पुणे – दोनच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या सुटीच्या रविवारचा (दि. २४ ऑगस्ट) योग साधत पुणेकर खरेदीसाठी बाहेर आल्याने मध्यवर्ती भागातील रस्त्यांना उत्साहाचे उधाण आले होते. नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये अक्षरश: झुंबड उडाल्याने बाजारपेठांसह जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
बुधवारी गणरायाचे आगमन होत असल्याने डेकोरेशनची लगबग घरोघरी सुरू झाली आहे. त्यासाठी बोहरी आळी, तुळशीबाग, मंडई, लक्ष्मी रस्त्यावर तुडूंब गर्दी झाली. मखर, चौरंग, मंडपी, रंगीत पडदे, रंगीबेरंगी प्लॅस्टिकची फुले यासह गणपतीपुढे मांडण्यासाठी विविध वस्तूंनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. बोहरी आळी, रविवार पेठेला रविवारी सुटी असली तरी अनेक दुकाने उघडी होती.
तसेच पथारी वाल्यांनी रस्त्यावर आपले दुकाने थाटली होती. अवाच्या सवा सांगितलेल्या रक्कमेतून घासाघीस करून महिलावर्ग सजावटीच्या वस्तू घेत होत्या. खरेदीने ताटकळलेल्यांसाठी खाद्यपदार्थांच्या गाड्याही सज्ज होत्या.
प्लॅस्टिकच्या फुलांना शेतकऱ्यांचा विरोध असला तरी बाजारपेठेत त्याच चायनामेड प्लॅस्टिक फुलांची बिनदिक्कत विक्री होत होती. तसेच सजावटीच्या अनेक चायनामेड गोष्टीही बाजारात दिसत होत्या. मोरपीसांची विक्री गुन्हा असला तरी बाजारपेठांमध्ये त्याची विक्री सर्रास सुरू होती.





