Pune News | नवरात्रौत्सवात पुणेकरांना पाण्याचा खोळंबा! ; महापालिकेच्या निर्णयावर संताप

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नवरात्रसारख्या सणाच्या काळात पुणेकरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. घराघरात उत्सवाच्या तयारीला लागलेले नागरिक पाण्याविना अडचणीत येत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तर स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी महापालिकेच्या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले ओसंडून वाहत आहेत, तरीसुद्धा पाणी बंद करण्याचा निर्णय म्हणजे प्रशासनाचा दृष्टिहीन व असंवेदनशील कारभार असल्याचे कदम यांनी म्हटले.
नवरात्रमध्ये घराघरात स्वच्छता, कपडे धुणे, उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याच वेळी पाणी बंद करणे म्हणजे नागरिकांच्या भावनांशी खेळ आहे. विशेषतः महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करून उत्सवाच्या काळात अन् भर पावसात पाणीपुरवठा बंद करणे हा सरळसरळ निष्काळजीपणा आहे. लोकप्रतिनिधी निवडून आले असते, तर प्रशासनाला संवेदनशीलता समजली असती. चुकीच्या वेळेस पाणी बंद करून महापालिकेने स्वतःचे दुर्बल व असंवेदनशील व्यवस्थापन असल्याची टीका त्यांनी पाणीबंदच्या निर्णयावर केली आहे.





